चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील अतिवृष्टी, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या पुनर्वसित गावांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील पुनर्वसित नागरिकांच्या समस्या आणि मागण्या अत्यंत मुद्देसूदपणे मांडल्या.
नागरी सुविधा आणि कायमस्वरूपी पुनर्वसनावर भर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील तिवरे, पेढे-कुंभारवाडी, गोवळकोट-कदमवाडी, बौद्धवाडी, कोळकेवाडी तसेच कोंढ्रण येथील बाधित नागरिकांच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आपत्तीग्रस्त नागरिकांना केवळ तात्पुरते स्थलांतरित न करता, त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका आमदार निकम यांनी घेतली. तसेच पुनर्वसित गावांमध्ये रस्त्यांसह सर्व आवश्यक नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
घरकुल अनुदान आणि जागेचे क्षेत्रफळ वाढवण्याची मागणी
पुनर्वसित नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी थेट धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी मंत्र्यां कडे केली. सध्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे २ लाख १० हजार रुपयांचे अनुदान वाढवून मिळावे, तसेच सध्या मिळणारी ५०० चौ.फुटांची जागा अपुरी असल्याने ती वाढवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, असे निकम यांनी बैठकीत सांगितले. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिले आहे.
चिपळूण-संगमेश्वरमधील पुनर्वसित गावांच्या प्रश्नांवर मुंबईत महत्त्वाची बैठक; अनुदान आणि जागा वाढवून देण्याची आमदार शेखर निकम यांची मागणी…
