चिपळूण : जागतिक नद्यांचे संवर्धन, शाश्वत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी चिपळुणात जागतिक नदी दिवस व नागरिक पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे.
‘जंगल नाही, नदी नाही, पाणी नाही, जीवन नाही’ या संदेशातून नदी व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नदी ही केवळ जलस्रोत नसून पर्यावरणीय समतोल आणि मानवी जीवनाचा महत्त्वाचा आधार असल्याने तिच्या संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित केले जाणार आहे.
कार्यक्रमामध्ये पर्यावरण जनजागृतीवर मार्गदर्शन, नदी संवर्धनावरील विशेष व्याख्यान, विद्यार्थ्यांचे सादरीकरण, मान्यवरांचे मनोगत, विशेष उपक्रम व प्रतिज्ञा तसेच नदी संवर्धनासाठी सामूहिक सहभाग असे विविध उपक्रम होणार आहेत.
या विशेष कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जलसंपदा उपविभाग, चिपळूण; अर्थ फाउंडेशन, चिपळूण; ग्लोबल चिपळूण, टुरिझम कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था आणि सह्याद्री निर्मिती मित्र सेवा साधना प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
