रोहा ( प्रतिनिधी) : एकल महिलांना धीर व सहकार्य करण्याच्या दृष्टीने सरकार पाऊल उचलणार असून राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आणण्याचा मानस असल्याचे मत राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. ज्यांनी आपले पती गमावले आहेत. अशा महिलांच्या सक्षमीकारणासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी नगर पालिकेने शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. उद्यान, क्रिडा सुविधा आणि महिलांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष यांसारख्या कामांचे आपल्या हातून लोकार्पण होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (ता.२७ ) मंत्री अदिती तटकरे व कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या रस्ते,उद्यान,बॅडमिंटन कोर्ट तसेच बसस्थानकावरील हिरकणी कक्ष आदी विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे,उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजय एडके,सभापती राजेंद्र जैन, महेश कोलाटकर,महेंद्र दिवेकर,रविंद्र चाळके,नीता हजारे,उपसभापती गौरी बारटक्के, गटनेता महेंद्र गुजर, नगरसेवक प्रशांत बंडू कडू, फराह पानसरे, आफरीन रोगे, आरबाज मणेर,आलमास मुमेरे,डॉ. प्रियांका धनावडे, संजना शिंदे, सुप्रिया जाधव, रोशन चाफेकर,अजित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
