दापोली : दापोली तालुक्यातील गावतळे या गावातील सर्व अधिकृत / अनधिकृत दारूधंदे बंद करण्याचा ठराव दिनांक ११ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत सभेमध्ये एकमताने करण्यात आला आणि त्याचे निवेदन दापोली पोलिस ठाणे,तहसीलदार ऑफिस यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की गावतळे हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ, असून नेहमी वर्दळ असते. गावातील दारूधंद्यामुळे सायंकाळी मध्यपी हे दारू पिऊन आपापसात शीवीगाळ करणे,हाणामारी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत तसेच गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन कुटुंब उध्वस्त होत असून कौटुंबिक तंटे निर्माण होत आहेत.
दारूमुळे गावात भुरट्या चोरींचे प्रमाण वाढले असून सदरचे दारूधंदे हे शाळा,हायस्कूलच्या परिसरात असल्याने विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे.पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ,महिला गावतळे गावातील दारूधंदे बंद व्हावेत अशी मागणी करत आहेत.त्यामुळे दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार गावात सर्व ग्रामस्थ,महिला याच्या बहुमताने गावातील चालू असलेले अधिकृत व अनधिकृत दारूधंदे, देशी,विदेशी दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत आणि भविष्यात गावात कोणत्याही नवीन दारू विक्रीला लायसन्स ,परवानगी देऊ नये असा ठराव एकमत करण्यात आला.
सदर निवेदन जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनाही पाठविण्यात आले आहे.