मुंबई : जंतरमंतर येथील २१ ऑगस्टच्या आंदोलनानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याचे ट्विट केले होते. या ट्विटचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. “आरएसएस आणि भाजप आरक्षण पूर्णपणे संपवण्याचा विचार करत आहेत,” असे थेट ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “२१ ऑगस्ट रोजी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर पूर्वनिर्धारित वेळेनुसार श्री हर्ष दुबे, श्री रणबहादूर सिंह चौहान आणि श्री मृत्युंजय पाठक यांच्यासह टीमच्या सदस्यांशी सौहार्दपूर्ण चर्चा झाली. या अनुषंगाने आपण लवकरच पुन्हा भेटू.”
नड्डा यांच्या या ट्विटला रिट्विट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या आरक्षणविषयक धोरणावर थेट प्रहार केला. त्यांनी लिहिले की, “आरएसएस आणि भाजप मिळून आरक्षण संपवण्याचा कट रचत आहेत. आरएसएस-भाजपच्या या आरक्षणविरोधी धोरणाला आणि अजेंड्याला केवळ आणि केवळ आंबेडकरवादी पक्षच रोखू शकतात.” आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध आंबेडकरवादी संघटना आणि पक्ष असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
