खेड :- रत्नागिरी येथील माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी येथे दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सीबीएसई अंतर्गत झालेल्या संगणकीय विचार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) समज या जिल्हास्तरीय उपक्रमात रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडने उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारशक्ती (Computation Thinking), तर्कशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मूलभूत समज विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील १५ सीबीएसई शाळांनी आपल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांवर आधारित Case Paper सादर केले. जिल्ह्यातील विविध सीबीएसई शाळांकडून सादर करण्यात आलेल्या Case Paper मधून रोटरी इंग्लिश स्कूलच्या Case Paper ला द्वितीय क्रमांक मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हास्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या Case Papers पैकी निवडक Case Paper पुढील राष्ट्रीयस्तरासाठी सीबीएसईकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे रोटरी इंग्लिश स्कूलच्या या Case Paper ला राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाची संधी मिळाली आहे. सदर उपक्रमासाठी रोटरी शाळेचे शिक्षक प्रसाद सावंत, प्रणित मेस्त्री, श्रद्धा खेडेकर आणि अलविरा परकार यांनी विशेष मेहनत घेतली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी स्कूलचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.भूमिता पटेल यांनी शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.