लांजा : शहरातील मुजावरवाडी येथील अलमीन आरिफ पावसकर (वय १६) हा मुलगा बेपत्ता झाला आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास क्लासला जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, अद्याप तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ता मुलाचा रंग सावळा असून, उंची पाच फूट दोन इंच आहे. त्याची शरीरयष्टी सडपातळ असून केस मोठे आहेत. घरातून बाहेर पडताना त्याने राखाडी रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पूर्ण लांबीची पँट परिधान केली होती. त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कूल बॅग होती.

या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.