महाड : महाड एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीत हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली. या गॅसगळतीचा फटका समोरच्या विनती कंपनीलाही बसला. या दुर्घटनेत सुमारे २५ ते ३० जणांना गॅसचा त्रास झाला असून, त्यापैकी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अमित कुमार (वय २८, मूळ रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. गॅसगळतीमुळे इंडो अमाइन्स कंपनीतील कामगारांसह परिसरातून जाणाऱ्या ग्रामस्थांनाही श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाला.
गॅसगळतीची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅसच्या संपर्कात आलेल्या कामगार आणि नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी अमित कुमार यांची प्रकृती गंभीर झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे महाड एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गॅसगळती नेमकी कशामुळे झाली, याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे.
