नाशिक – नाशिकला वाढवण बंदराशी थेट जोडण्यासाठी मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे नाशिक अभियांत्रिकी, पुरवठा व्यवस्थापन आणि निर्यात या क्षेत्रांतील महत्त्वाचे केंद्र होणार आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नाशिक हे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. मुंबई, पुणे आणि नाशिक हा पूर्वीपासूनच महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा त्रिकोण राहिला आहे. काही काळ नाशिकच्या औद्योगिक विकासाची गती मंदावली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नाशिकच्या विविध क्षमता विकसित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे नाशिक पुन्हा एकदा वेगाने विकसित होत आहे. पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून नाशिक उदयास येईल. नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या भागात दर्जेदार आणि रोजगारक्षम मानव संसाधन निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३० हजार कोटींची गुंतवणूक
नाशिकच्या विकासाचा उल्लेख करतांना फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये कृषी व विशेषतः द्राक्ष उत्पादन आणि निर्यात, अन्नप्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध क्षेत्रांतील उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातून उद्योग आणि ‘युनिकॉर्न’ तयार होण्याची अपेक्षा
जगातील अनेक आघाडीच्या कंपन्या आणि नवकल्पनांचा उगम विद्यापीठांमधून झाला आहे. त्यामुळे विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि त्या पुढे आणणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या क्षेत्रात काम सुरू केले आहे. मात्र, जागतिक पातळीवरील बदल लक्षात घेता नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेला आणखी चालना देण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठातून भविष्यातील मोठे उद्योग आणि ‘युनिकॉर्न’ निर्माण व्हावेत, यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे कौशल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.