मुंबई : देशातील राष्ट्रभक्त तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई केलेली आहे. स्टार्टअप किंवा मेक इन इंडिया असो, यात तरुणाई सातत्याने मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. त्यामुळे देशातील तरुणांची माथी भडकवून हा देश पेटवायची संजय राऊत यांची कितीही इच्छा असली तरी ती कधीच पूर्ण होणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या डोक्यावरची भगवी टोपी काढून आंदोलन केले. आधी त्यांनी भगवे विचार काढून टाकले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुडकावले. आता यांना भगवी टोपीही नकोशी झाली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना बाजूला करत संपूर्ण नेतृत्व आपल्या हातात यावे, अशी आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे. मात्र शिवतीर्थावरील आंदोलनात भगवी टोपी झिडकारली त्यांना हिंदुत्ववादी लोक झिडकारल्याशिवाय राहणार नाहीत. नेतृत्व करायचे असेल तर भगवी टोपी घाला, हिंदुत्ववादी विचार पाठीशी ठेवा आणि आंदोलन करा. मगच तुमचा पक्ष टिकेल. ‘रामाची रक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय’, असे म्हणणारे उद्धव ठाकरे विसरले की संपूर्ण विश्वाची आणि भक्तांची रक्षा प्रभू रामचंद्र करत असतात. ‘जो ना प्रभू राम का, वो ना किसी काम का’ हे सगळ्यांना माहित असल्याने आपण आपल्या पक्षाच्या रक्षेचा विचार करा. अन्यथा त्या पक्षाची रक्षा नव्हे, राख झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.
दिल्लीतील आंदोलनावर न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य तो तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट करून श्री. बन म्हणाले, या आंदोलनाच्या आडून संजय राऊत आणि उबाठा गट आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. रामरक्षा आंदोलनात संजय राऊत यांची फजिती उडाली. रामरक्षा आंदोलन करायला निघालेल्यांना रामरक्षा वाचताही आली नाही. अशी फजिती करून घेण्याची सवय संजय राऊतांना सातत्याने झाली आहे.
संजय राऊत, तुम्ही ईडीवरही मोर्चा काढला होता, कारण भ्रष्टाचार करणे तुमची सवय आहे. ईडीचे दुखणे काय असते, हे संजय राऊतांना जास्त माहिती आहे. पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी रुपये लुटल्याच्या आरोपावरून ईडीने तुम्हाला अटक केली होती. ईडीविरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, अशी तुमची इच्छा आहे. पण विनाकारण ईडीवर टीका करू नका. तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांसाठी ईडी हा एकमेव पर्याय आहे. जसा तुम्ही भ्रष्टाचार केला त्याचपद्धतीने तुमच्याकडून पै न पै वसूल केला जाईल आणि तुमच्या भ्रष्टाचाराचे कारनामे जनतेसमोर येतील, अशी खरडपट्टी श्री. बन यांनी काढली.
तुमच्या बाजूने निकाल लागले की सगळ्या यंत्रणा, ईडी, सीबीआय चांगले असते. केरळमध्ये काँग्रेस जिंकली की निवडणूक आयोग स्वायत्त आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकली की निवडणूक आयोगावर शंका घायची. संजय राऊत हे दोन्ही बाजूने चालणाऱ्या गांडूळासारखे आहेत. हे गांडूळ उबाठा गट भुसभुशीत करून त्याचे अस्तित्व संपवण्याचे काम करत आहे, हे महाराष्ट्राने ओळखले आहे. काँग्रेसची चड्डी घालून राहुल गांधींचा प्रचार करणाऱ्या संजय राऊतांनी आधी त्यांच्या चड्डीत काय घुसले ते पहावे, असे श्री. बन यांनी सुनावले.
तरुणांची माथी भडकवून देश पेटवण्याची संजय राऊतांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही- नवनाथ बन…!
