लांजा : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल अँड तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आयटी लॅबचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे चेअरमन जयवंत शेट्ये होते. मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून, फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून आयटी लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, संचालक प्रसन्न शेट्ये व सचिन भिंगार्डे, सल्लागार विजय बेर्डे व संतोष कोलते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे, पर्यवेक्षक रविंद्र वासुरकर, आयटी शिक्षक प्रा. सचिन जोशी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ही आयटी लॅब महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यातील स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यास ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन ललिता कल्लोळे यांनी केले, तर नामदेव यमगर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.