नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या सेवांचा मोठा विस्तार होत आहे.
रविवार २९ मार्च २०२६ पासून हा विमानतळ देशातील आणखी ३० शहरांना जोडला जाणार आहे.
या नव्या शहरांमध्ये देशातील श्रीनगर, जम्मू, तिरुपती, तिरुवनंतपुरम, दाभोळी(गोवा) तसेच राज्यातील कोल्हापूर इत्यादींचा समावेश आहे.
गेल्या वर्षी या विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सोळा शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्या होत्या.
सर्व सेवा दिवसाच्या होत्या.
आणखी तीस शहरे जोडली जाणार असल्याने एकूण ४६ शहरांसाठी नवी मुंबईतून विमाने सुटणार आहेत.
उन्हाळी सुट्टीसाठी २९ मार्च २०२६ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठीचे पहिले वेळापत्रक जाहीर झाले.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एन.एम.आय.ए.) कंपनीने याबाबत एका पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केली.
दरम्यान, या विमानतळावरून व्यापारी, पर्यटन तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांकडे उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली आहे.
यात विशेषतः दिल्ली (दररोज ९ उड्डाणे), गोवा (७), बंगळुरू (६) आणि कोची (५)
या शहरांकडे सर्वाधिक उड्डाणे नियोजित आहेत.
याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित हवाई सेवा मिळणार आहे.
या उन्हाळी वेळापत्रकात इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या तीन विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालविणार असून, त्यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
नव्या वेळापत्रकामुळे या विमानतळावरून दिवसाला सरासरी १५६ तर आठवड्याला सुमारे १,०९२ उड्डाणे होऊ लागतील.
प्रारंभी सुरूवातीला दररोज २२ उड्डाणे असताना एप्रिल २०२६ महिन्यापर्यंत ती वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
या विस्तारामुळे टियर-१ आणि टियर-२ शहरांमधील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
विशेषतः पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि धार्मिक स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना थेट उड्डाणे वाढणार आहेत.
यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताणही काही प्रमाणत कमी होईल.
पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळावरून दरवर्षी सुमारे नऊ कोटी प्रवासी ये-जा करू शकतील अशी अपेक्षा आहे.
आज पासुन विमानसेवांचा विस्तार नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा तिरुपती;तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा.
