रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे, खांबाचा मळा परिसरात शनिवारी एका अत्यंत दुर्मीळ ब्लॅक पँथरने (काळा बिबट्या) विहिरीत उडी घेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. वासराचा पाठलाग करण्याच्या नादात शिकारीच्या ईर्षेपोटी हा काळशार बिबट्या थेट विहिरीत कोसळला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाने शनिवारी दिवसभर युद्धपातळीवर प्रयत्न केले, मात्र निसरड्या भिंती आणि पाण्याची खोली यामुळे वनविभागाची मोठी दमछाक झाली असून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास एका वासराची शिकार करण्यासाठी या ब्लॅक पँथरने त्याचा पाठलाग सुरू केला होता. अंधारात शिकारीच्या नादात या बिबट्याला विहिरीचा अंदाज आला नाही आणि तो थेट भागवत यांच्या विहिरीत कोसळला. सकाळी ७ च्या सुमारास विहिरीजवळ हालचाल जाणवल्याने ग्रामस्थानी डोकावून पाहिले असता, पाण्यात पडलेला हा दुर्मिळ वन्यजीव पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली, ज्यामुळे परिसरात भीतीसह कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले, घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम पिंजरा आणि अत्याधुनिक रेस्क्यू साहित्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

मात्र, विहिरीतील पाण्याची पातळी आणि बिबट्याचा पिंजऱ्याला मिळणार प्रतिसाद यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात ओढण्यासाठी दिवसभर विविध क्लृप्त्या लढवल्या, पण बिबट्या पिंजऱ्यात येण्यास तयार नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. विहिरीच्या भिंती आणि खोली यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दिवसभर मोठ्या अडचणी पाहायला मिळाल्या शनिवारी सायंकाळी अंधार पडल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन अधिकच धोकादायक आणि जटील बनले आहे. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याला कोणतीही इजा न होता बाहेर काढण्याचे मोठे दडपण प्रशासनावर आहे. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने विहिरीभोवती सुरक्षा कवच तैनात केले असून, रात्रभर पहारा देण्याचे नियोजन केले आहे रविवारी सकाळी पुन्हा नव्या जोमाने या ब्लॅक पँथरला बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे.