पोलादपूर- आग्रा ते राजगड मशाल दौडसाठी बावटा दाखवायला गेल्यावर आग्रा येथे भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी चर्चा सुरू होती. यावेळी रायगडचा पालकमंत्री झाल्याचा निरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राज्याभिषेक सोहळा झाला आणि आपण आग्र्याला असताना पालकमंत्री, असे मार्मिक भाष्य रायगडचे नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर येथील नागरी सत्कार व स्वागतप्रसंगी केले.
मंगळवारी व व बुधवारी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेने ठिकठिकाणी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे उत्साहात स्वागत केले. पोलादपूर तालुक्यातील जनतेने ना. गोगावले यांचा शुक्रवारी स्वागत सत्कार सोहळा दणक्यात साजरा केला.
पालकमंत्री गोगावले यांनी, आईवडिलांनी जन्म दिला, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि मायबाप जनतेने चारवेळा निवडून दिले म्हणून आज आपण पालकमंत्री झालो, असे सांगून सर्वच बाबतीत संघर्ष करावा लागला असताना सबुरीका फल मिठा होता है, हा आनंद देखील मिळाल्याचे सांगितले. यावेळी मंत्री गोगावले यांनी जे दुरावले त्यांना जवळ घ्या; नगरपंचायतीच्या निवडणुकीला अनुकूलता वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी व्यासपिठावर पालकमंत्री गोगावले यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सुषमा गोगावले, मुलगा विकास गोगावले, तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव, पं.स.सभापती अविनाश शिंदे व पं.स. सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जि. प. सदस्य डॉ. निलेश कुंभार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्षा अस्मिता पवार व सर्व नगरसेवक, शहर प्रमुख सुरेश पवार, नायक मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे, उद्योजक रामदास कळंबे, कृऊबा समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, तालुका महिला संघटक सुवर्णा कदम, विभागप्रमुख सतीश शिंदे तसेच माजी नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युवासेना कोकण कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांनी, भरतशेठ गोगावले यांच्यावर राज्याची मंत्री पदाची जबाबदारी आहे रायगड पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे त्यामुळे ते उपलब्ध होतील की नाही पण आम्ही स्थानिक पदाधिकारी जनतेच्या सेवेसाठी केव्हाही उपलब्ध राहू, अशी ग्वाही देऊन मतदार नोंदणीकडेही कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन केले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी, भरतशेठ गोगावले यांना आमदारकीच्या तिकिटापासून मंत्री पद तसेच पालकमंत्री पदापर्यंत सातत्याने संघर्ष करावा लागला. आज भरतशेठ पालकमंत्री झाल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून त्याला साजेसे काम करण्याची गरज आहे, असे सांगितले.
याप्रसंगी कृऊबा समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी प्रस्तावना केली. यावेळी पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता पवार आणि सर्व नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार केला. तालुक्यातील विविध संघटनांनी यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार केला.
दुपारी शिवसेनेच्या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तेथून कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली.
