मुंबई :काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक फाडल्याच्या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. या कृतीतून पुस्तक फाडणाऱ्यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते. पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही. अशा कृतीतून सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडत नाही. पुस्तक फाडण्याची ही कृती म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडल्याच्या घटनेचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुस्तक फाडल्याने सोनिया गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व कमी होत नाही. मात्र, या कृतीतून संबंधितांची वैचारिक भूमिका दिसून येते. पुस्तक वाचून त्यावर चर्चा करावी. पुस्तक इंग्रजी भाषेत असल्याने ते वाचण्यात अडचण येत असावी, अशी टीकाही त्यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत. त्यावर टीका करायची असेल, तर संबंधित निर्णयांचे शासन निर्णय फाडून दाखवावेत, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले. एका महिलेचे पुस्तक महिलांच्या माध्यमातून फाडण्यात आले, ही बाब दुर्दैवी आहे. हा प्रकार महिलांच्या सन्मानालाही बाधा पोहोचवणारा आहे.

सोनिया गांधी यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. त्यांच्या सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारून त्याग केला. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान आणि त्याग केला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडणे ही कृती अशोभनीय आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करून अशा राजकीय कृतींना चोख उत्तर देऊ, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुस्तकाची पाने फाडून सत्य पुसले जात नाही : विजय वडेट्टीवार

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ फाडून ज्यांनी निषेध नोंदवला, त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेचे दर्शन घडवले आहे. ज्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, बोलण्याचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य आहे, त्या देशात पुस्तकाच्या प्रती फाडणे योग्य नाही. या पुस्तकातील वस्तुस्थिती मान्य नसेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करावा. त्याविरोधात पुस्तक लिहावे. पुस्तकाच्या प्रती फाडणे ही योग्य पद्धत नाही. अशा प्रकारांना फार काळ समर्थन मिळणार नाही, असे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती काही कार्यकर्त्यांनी फाडल्या. एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुस्तक वाचावे आणि त्यातील मुद्द्यांवर चर्चा करावी. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे.

या कृतीत सहभागी असलेल्यांपैकी अनेकजण सत्तेच्या जवळ राहण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांत गेले आहेत. त्यामुळे ज्यांना स्वतःचाच इतिहास आणि राजकीय प्रवास माहीत नाही, त्यांनी सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावर बोलणे हास्यास्पद आहे, असे काँग्रेस कार्यकारिणीचे (CWC) सदस्य बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

शिंदेसेनेने सात्यकी सावरकर यांना विचारावे : सचिन सावंत

ज्या पक्षाची विचारधारा पैशांभोवती फिरते, त्यांच्या पुस्तक फाडण्याच्या कृतीने काहीही फरक पडणार नाही. तसेच, पक्षाचे प्रवक्ते म्हणून पत्रकार परिषद घेणारे काही नेते दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यांना स्वतःच्या विचारांवर ठाम राहता आले नाही. पुस्तक फाडता येईल; पण सत्य कसे फाडणार? असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी केला.

या पुस्तकात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान असल्याचा दावा काही जण करत आहेत. मात्र, यासंदर्भात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे संबंधितांनी सात्यकी सावरकर यांच्याकडून याबाबत माहिती घ्यावी. या विषयावर बोलणाऱ्यांनी इतिहासाचा अभ्यास करून भूमिका मांडावी, असेही सावंत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जाहिरात दिली होती, याचा त्यांना विसर पडला आहे का? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केला.