मुंबई : मराठी भाषेचा शब्दकोश, विश्वकोश असतो, तसा नर्कतीर्थ संजय राऊत यांनी एक अश्वकोश तयार करून त्याचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करावे. जे शब्द ते जाहीरपणे वापरतात त्यासाठी शब्दकोश नाही तर अश्वकोश हाच शब्द योग्य राहील. त्यांनी वापरलेल्या या शब्दांमुळेच उबाठा गटाची पार वाट लागली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत, जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकते तिथे लोकशाहीचा विजय असतो. तामिळनाडूमध्ये विरोधक जिंकले की लोकशाहीचा विजय असतो, असे सुनावत श्री. बन म्हणाले, गेली पंधरा वर्षे पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी आपल्या राजवटीत जी दादागिरी, गुंडगिरी केली ते पाप धुऊन काढण्याचे काम पश्चिम बंगालच्या जनतेने केले. तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सरकारचे अडीच वर्षाचे पाप धुवून काढण्याचे काम एकनाथजी शिंदे यांनी केलं.

संजय राऊतांची लोकप्रियता अंतराळात पोचली
इंदिरा गांधी कधीकाळी सर्वात लोकप्रिय नेत्या होत्या. परंतु आजच्या घडीला संजय राऊत यांची लोकप्रियता महाराष्ट्र, देश, संपूर्ण जगच नाही तर त्यापलीकडे जात अंतराळातही क्रमांक एकवर आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त एकच नाद घुमतो तो म्हणजे संजय राऊत, संजय राऊत. संजय राऊतांची वक्तव्ये ऐकून उद्धव ठाकरे तर तोंडाला रुमाल लावून हसत असतील, अशा शब्दांत श्री. बन यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.