मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील सर्व आठही खासदार आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत.त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांची संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,पंतप्रधान हे सगळ्या पक्षांच्या खासदारांना नियमितपणे भेटतात.आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या कामांसाठी अधिकृतपणे सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांना भेटून राज्याचे प्रश्न मांडणे हा आमचा अधिकार आहे. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,सध्या ज्या स्वरूपात हे बिल आणले जात आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्पष्ट विरोध आहे.आमची सरकारला विनम्र विनंती आहे की हे बिल घाईघाईत मंजूर करू नका, ते मागे घ्या. जर तुम्हाला ते मागे घ्यायचे नसेल, तर ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवा. तिथे सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करतील. ड्रग मनी किंवा टेररिस्ट मनी असेल तर नक्कीच कारवाई करा, पण जर परदेशातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी किंवा पोलियो इंजेक्शनसाठी निधी येत असेल, तर त्याला डर्टी मनी कसे म्हणता येईल? परदेशी निधीकडे नेहमी संशयाने आणि वाईट नजरेने पाहणे चुकीचे आहे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या गोंधळाबाबत आणि जंतर-मंतरवर आंदोलकांवर झालेल्या पॅलेट गनच्या हल्ल्याबाबत सत्य बाहेर आले पाहिजे. संसदेचे दरवाजे बंद करून आणि अश्रुधुराचा वापर करून आंदोलन कसे दडपले गेले, याची पारदर्शक एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.