दापोली : मराठा समाजातील युवक-युवतींना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजातील विविध आर्थिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून महामंडळ अधिक सक्षम करावे, अशी मागणी सकल मराठा परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांना देण्यात आले.
मराठा समाजातील मोठा वर्ग हा व्यवसाय, स्वयंरोजगार आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. अशा युवकांना उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांना स्वावलंबी होता यावे, यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सुरू असलेले आर्थिक विकास महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मराठा उद्योजकांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली आहे. महामंडळाचे कामकाज डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासह निधीची तरतूद करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष लाभ घेताना अनेक लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कर्ज योजना मिळविताना उत्पन्न दाखला, अनावश्यक कागदपत्रे, बँकांकडून मागितल्या जाणाऱ्या जामीनदार व इतर अटी, LOI नंतरची प्रक्रिया तसेच व्याज परतावा मिळण्यास होणारा विलंब यामुळे अनेक पात्र युवकांना योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये उत्पन्न दाखल्याच्या निकषांमध्ये आवश्यक सुधारणा करून पात्र मराठा युवकांना कर्ज योजनांचा लाभ मिळावा, तसेच महिला अर्जदारांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळून अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाहन कर्जासाठी जिल्हानिहाय व व्यवसायनिहाय उपलब्ध कोटा महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करावा आणि प्रत्येक अर्जदाराला आपल्या पसंतीचा व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
