मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात आणि राज्यात सातत्याने पेटणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनुवादी विचारांच्या लोकांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “आरक्षण ही काही खैरात किंवा दान नाही, तर ते सामाजिक न्यायाचे एक घटनात्मक हत्यार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरक्षणाची व्याख्या अधोरेखित केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर (ट्विटर) पोस्ट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मनुवाद्यांनो, लक्ष देऊन ऐका. आरक्षण ही काही खैरात नाही. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे सामाजिक न्यायाचे एक ‘घटनात्मक हत्यार’ आहे. आरक्षण हे जातनिहाय आणि मनुवादी सामाजिक व्यवस्थेविरुद्धचे एक सकारात्मक धोरणात्मक औषध (उपाय) आहे; ज्या व्यवस्थेने भेदभाव व शोषणाला संस्थात्मक स्वरूप दिले आणि संसाधने, संधी तसेच राजकीय व सामाजिक सत्तेच्या वाटपात रचनात्मक विषमता निर्माण केली आणि ती पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली.