खोपोली : राष्ट्रसेविका समितीच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण कोकण प्रांतात ‘घोषवादन विशेष स्वरतरंगिनी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कोकण प्रांतात समाविष्ट असलेल्या एकूण नऊ जिल्ह्यांसह एका महानगरात साखळी पद्धतीने घोषवादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर खोपोली येथील प्राचीन व ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध भजन गायिका मयुरी पाटील उपस्थित होत्या.
प्रमुख वक्त्या मेघना जोशी यांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. तसेच, विविध ठिकाणी समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी समितीच्या प्रांताधिकारी मंजुषा शेंडे, कार्यवाहिका रुची काळे आणि सहकार्यवाहिका माधवी कुवळेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, नगरसेविका अश्विनी यात्रे, माजी नगरसेवक मनीष यादव यांच्यासह अनेक मान्यवर आणि खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या घोषवादनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. घोषवादनाचे स्वर ऐकून खोपोलीकर अक्षरशः सुखावले.
