बारामती : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग, ठेकेदारांची थकीत बिले, सरकारी शाळांमधील आंदोलन आणि एसआयआर प्रक्रियेसह विविध मुद्द्यांवर राज्य सरकारवर निशाणा साधला. शक्तिपीठ महामार्गाबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करून योग्य तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शक्तिपीठ महामार्गावर मोठा खर्च करण्यापेक्षा आधी राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, त्यानंतर अशा मोठ्या प्रकल्पांचा विचार करावा, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील ठेकेदार थकीत बिले मिळावीत, या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे सांगत, शासन हजारो कोटींचे प्रकल्प राबवत असेल तर ठेकेदारांची बिले का दिली जात नाहीत, असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. अभिजित दिपके यांच्या सरकारी शाळांशी संबंधित आंदोलनावर सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा निषेध करत, ‘ही लोकशाही आहे, दडपशाही नाही,’ असे त्या म्हणाल्या. एसआयआर प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळाला असून, ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी पक्ष संघटना ताकदीने काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १६ ऑक्टोबरच्या संभाव्य बारामती दौऱ्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी यांना पत्र दिले असून, दौऱ्याची तारीख पुढे-मागे होऊ शकते; मात्र त्याबाबत पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या १२ वर्षांपासून विरोधात असून, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार असल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.
