मुंबई : चौदा कोटी जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. देवेंद्रजी दिल्लीला जातील, अशी कितीही भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली तरी त्यांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. आधी आपल्या मालकांची आणि पक्षाची काय वाट लागली ते पहा आणि मग देवेंद्रजींवर बोला. तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘महाराष्ट्र की यही पुकार, अब की बार देवाभाऊ की सरकार,’ असे म्हणत महाराष्ट्राने देवेंद्रजींना निवडून दिले. संजय राऊत, तुम्ही सांगितले होते की 25 वर्षं महाविकास आघाडीचे सरकार राहील. तुम्हाला 25 महिनेही तुमचे सरकार टिकवता आले नाही आणि तुम्ही देवेंद्रजींबद्दल भविष्यवाणी करत आहात. राष्ट्राची पुकार ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी तर महाराष्ट्राची पुकार ही देवाभाऊंसाठी आहे. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस दिल्लीला जातील, केंद्रीय मंत्री होतील अशी कितीही स्वप्ने पाहिलीत तरी ती पूर्ण होणार नाहीत. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी देवाभाऊ सक्षम आहेत, असे श्री. बन म्हणाले.
मी पुन्हा येईन, असे देवाभाऊ म्हणाले तेव्हा ते एकटे आले नाहीत तर पुर्ण बहुमतासह पुन्हा आले. एकतर तू राहशील किंवा मी राहीन, म्हणणाऱ्या उद्धवजी ठाकरेंची महाराष्ट्राने काय अवस्था केली आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना महाराष्ट्राने 2024 ला पुन्हा निवडून दिले. देवेंद्रजी फडणवीस जे सांगतात, ते पूर्ण होते. तुमच्यासारखे खोटे बोलण्याची सवय देवाभाऊंना नाही, असे श्री बन यांनी सुनावले.
संजय राऊतांनी आधी ‘उबाठा’चे भविष्य बघावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार..
