मुंबई – जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला आहे. जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा वैशाली नागवडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. पोलिस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण संरक्षण व न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही वैशाली नागवडे यांनी केली आहे.
पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिच्या कुटुंबाच्या दुःखाचा आणि परिस्थितीचा गैरवापर होऊ नये, याचीही काळजी समाजाने घ्यावी. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका वैशाली नागवडे यांनी घेतली आहे.