खेड : कोकणातील सहकार क्षेत्राचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक असून, येथील सहकारी पतसंस्थांकडून होत असलेली १०० टक्के कर्जवसुली ही कोकणच्या आर्थिक शिस्तीचे आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. शेतकरी व कष्टकरी वर्ग घेतलेले कर्ज वेळेवर प्रामाणिकपणे फेडत असल्याने कोकण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे दिसून येते, असे गौरवोद्गार राज्याचे मंत्री ना. योगेश कदम यांनी काढले.
सरोदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (टेटवली) यांच्या खेड येथील तिसऱ्या ‘समाज पतपेढी’ शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ‘सहकारिता साधना’ या सहकार गीताने झाली. यावेळी संस्थेच्या १९ वर्षांच्या वाटचालीवर आधारित माहितीपटही सादर करण्यात आला.
ना. योगेश कदम पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अधिक व्यापक आणि भक्कम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. कोकणातील सहकार क्षेत्र किती स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने कार्यरत आहे, याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मागील दीड वर्षाच्या काळात कोकणातील आर्थिक घोटाळा अथवा गैरव्यवहाराची एकही फाईल त्यांच्याकडे आलेली नाही. ही बाब संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या १९ वर्षांत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करत जनसामान्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या सरोदे पतसंस्थेचे ना. कदम यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या आगामी चौथ्या शाखेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला पद्मश्री दादा इदाते, जिल्हा उपनिबंधक श्री. राम कुलकर्णी, माजी आमदार संजय कदम, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपसभापती सुनील मोरे यांच्यासह अनेक पतसंस्थेचे पदाधिकारी, राजवैभव पतसंस्था अध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, मुरली मनोहर पतसंस्था अध्यक्ष श्री. संजय मोदी, संचालक मंडळाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१०० टक्के कर्जवसुली हा कोकणचा गौरव; सहकार क्षेत्र प्रामाणिक व सक्षम — ना. योगेश कदम..
