रायगड : रायगड युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून, त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांचे पेण तालुक्यातील डोलवी येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी केली.
डोलवी परिसरातील मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रीटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचीही आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.
भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे डोलवी ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. महामार्गावरील मोठमोठे खड्डे आणि भुयारी मार्गातील पाण्याची दुरवस्था पाहून आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर आदित्य ठाकरे यांचे पेण तालुक्यातील वाशीनाका येथे आगमन झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारींबाबतची निवेदने आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाची सद्यस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे पुढेही महामार्गाच्या विविध भागांची पाहणी करणार आहेत.