श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य आदगाव कोळीवाडा नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पारंपरिक जल्लोषाने दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कोळीगीतांचा ठेका आणि रंगीबेरंगी सजावटीने संपूर्ण कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आदगाव येथे पारंपरिक पद्धतीने श्रीफळ अर्थात नारळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष सजवलेल्या सोन्याच्या नारळाची ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कोळीगीतांच्या तालावर मिरवणूक समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेण्यात आली.
या मिरवणुकीत मच्छीमार कोळी समाजबांधवांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक काठपदराच्या लुगड्या, टोपी आणि फेटे परिधान केलेल्या सहभागींच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. चिमुकल्यांनी पारंपरिक नृत्यावर धरलेला ठेका उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर विधिवत पूजन करून दर्याराजाला नारळ अर्पण करण्यात आला. समुद्र शांत राहावा, मच्छीमार बांधवांचे रक्षण व्हावे तसेच आगामी मासेमारीचा हंगाम सुखरूप, सुरक्षित आणि भरभराटीचा जावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
कोकणातील मच्छीमार समाजासाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. सागराची पूजा करून नारळ अर्पण केल्यानंतर नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करण्याची परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जपली जात आहे. पावसाळ्यात काही काळ थांबलेली मासेमारी आता नव्या हंगामात पुन्हा सुरू होणार असल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आदगाव कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा हा उत्सव केवळ धार्मिक विधी न राहता कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि समुद्राशी असलेले अतूट नाते जपणारा उत्सव ठरला. संपूर्ण कोळीवाड्यातील ग्रामस्थ एकत्र येऊन दर्याराजाला साकडे घालत असल्याने उत्सवाला सामाजिक एकतेचीही जोड मिळाली.
नारळ अर्पण केल्यानंतर सजवलेल्या नौका आणि बोटी नव्या मासेमारी हंगामासाठी समुद्रात झेपावण्यास सज्ज झाल्या असून, यंदाचा हंगाम चांगला जावा आणि मच्छीमार कुटुंबांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, अशी अपेक्षा आदगाव कोळीवाड्यातील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.