दापोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरातील बाजारपेठ व गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील धोकादायक विद्युत वाहिन्या, खाली आलेल्या सर्व्हिस लाईन तसेच कमी उंचीवरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने तातडीने पाहणी करून धोकादायक विद्युत वाहिन्या सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत श्री. स्वरूप नंदकुमार महाजन, दापोली, यांनी आज दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी महावितरण, दापोली यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
दापोली शहरातील बाजारपेठ परिसरातून दरवर्षी गणेश आगमन तसेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते सहभागी होतात. मिरवणुकीदरम्यान मोठ्या उंचीची वाहने, रथ, देखावे तसेच गणेशमूर्ती नेण्यात येतात. मात्र, बाजारपेठ परिसरातील अनेक ठिकाणी विद्युत खांबांवरील सर्व्हिस लाईन व विद्युत वाहिन्या आवश्यक उंचीपेक्षा कमी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नटराज नाका, गोखले वाचनालय, छाया फोटो स्टुडिओ, खरेदी-विक्री संघ, गाडीतळ तसेच दापोली शहरातील इतर अनेक ठिकाणी सर्व्हिस लाईन खाली आलेल्या आहेत. काही ठिकाणी ११ के.व्ही. विद्युत वाहिन्यांनाही आवश्यक सुरक्षित अंतरापेक्षा कमी उंची असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान या विद्युत वाहिन्यांचा मोठ्या उंचीच्या वाहनांना किंवा देखाव्यांना स्पर्श होण्याची शक्यता असून गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा दापोलीकरांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव असून या काळात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वीच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे.
महावितरणकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी दापोली शहरातील बाजारपेठ व मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील उपाययोजना तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनावश्यक व धोकादायक सर्व्हिस लाईन काढून टाकण्यात याव्यात.
विस्कळीत अथवा वाकलेल्या सर्व्हिस लाईन योग्य उंचीवर सुरक्षितपणे न्याव्यात.
ज्या ठिकाणी ११ के.व्ही. विद्युत वाहिन्या आवश्यक उंचीपेक्षा कमी आहेत, त्या ठिकाणी त्या आवश्यक प्रमाणात उंचावर नेऊन सुरक्षित कराव्यात.
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व विद्युत वाहिन्या, खांब व जोडण्या तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्युत वाहिन्यांमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती व्यवस्था करावी.
गणेशोत्सव हा दापोलीकरांच्या श्रद्धेचा व आनंदाचा उत्सव असून, या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी गणेशोत्सवापूर्वीच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका सुरक्षित, शांततापूर्ण आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महावितरण विभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि धोकादायक विद्युत वाहिन्या सुरक्षित करण्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दापोलीकरांकडून व्यक्त होत आहे.