मुंबई – बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह,
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता व्ही. पी. पैठणकर, सीसीएम डॉ. सुमंत देऊळकर, विल्यम केरी यांच्यासह रेल्वे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवेसाठी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी बीडकरांची ४० वर्षांची प्रतिक्षा संपवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी (१७ सप्टेंबर २०२५ रोजी) ‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली आणि आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू होत आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

‘बीड–पुणे’ रेल्वे सुरू झाल्यानंतर जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट व अधिक सक्षम रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे. बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

१७ सप्टेंबर रोजी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी दिल्या.

येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवेच्या ऐतिहासिक शुभारंभ कार्यक्रमाची सर्व तयारी अत्यंत नियोजनबद्ध, प्रभावी आणि समन्वयाने करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

‘बीड–पुणे’ आणि पुढे ‘बीड–मुंबई’ ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.