मुंबई : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘महागाई की मार नहीं चलेगी’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी भाज्या आणि धान्यांचे हार गळ्यात घालून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधले आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, घरात जाऊन तुमच्या आई, बहीण आणि पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे. भाज्या, धान्य, दूध, साखर यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या दरांचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून, सरकारने महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष घरगुती खर्चातील फरकावर आहे, फूड इन्फ्लेशन किती आहे, हा प्रश्नच आहे. तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई, बहीण किंवा पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे. घरातील खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आज प्रत्येक कुटुंबासमोर आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते घरातील रोजच्या स्वयंपाकापर्यंत महागाईचा परिणाम जाणवत आहे. दूध हा मूलभूत पदार्थ आहे. सकाळची सुरुवातच दुधापासून होते. मात्र, त्याचे दरही वाढले आहेत. सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम सरकार करत आहे, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात अनेक योजना आणि सवलतींची चर्चा होते,मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांची अंमलबजावणी किंवा सातत्य कुठे दिसते, आनंदाचा शिधा मिळाल्याने गरीब आणि गरजू कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. मात्र आता ही योजना पूर्वीप्रमाणे दिसत नाही,निवडणुकीनंतर मोठ्या संख्येने महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आली आहे. या महिलांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे , असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,महागाईचा प्रश्न केवळ शहरातील कुटुंबांपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे,शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. सरकारने कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला, मात्र प्रत्यक्षात अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला किती न्याय मिळाला,जो शेतकरी मातीशी इमान राखून आपला अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो, त्याला न्याय मिळाला पाहिजे. शहरात कष्ट करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही महागाईची झळ दररोज बसत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या जीवनमानावर महागाईचा परिणाम होत आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, प्रत्येक मतदाराने मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासावे,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार दिला आहे. हा अधिकार गमावू नका. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. नाव दुबार असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी आणि नाव यादीतून गायब असल्यास तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही सुप्रियाताई सुळे यांनी केले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मराठा समाज, ओबीसी, आदिवासी, महिला, आश्रमशाळांमधील विद्यार्थी अशा विविध घटकांकडून आंदोलन केले जात आहे,सरकारला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे. जोपर्यंत आंदोलन शिगेला पोहोचत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येत नाही, असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.