मुंबई : मराठी मध्ये बाळस धरणे आणि सूज असे दोन शब्द आहेत दोघांचे अर्थ भिन्न आहेत. आज आपण दहिहंडीमध्ये गौतमी पाटील यांच्या सारख्या नृत्यांगणा जी लावणी सादर करीत आहेत ती लावणीला पैशांसाठी आलेली सूज आहे, अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आज लावणीच्या नावावर सुरू असेल्या धागडधिंग्यावर हल्ला चढवला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिश्मा सभागृहात उत्साहात बुधवारी संपन्न झाला.
लेखक व फोटोग्राफर डॉ. नितीन सोनावणे यांनी लिहिलेल्या व छायाचित्रित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या स्मृतींना प्रकाशचित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासोबतच शेखर निरंजन भाकरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीता कैलास खेडेकर यांनी केले.
यावेळी मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगीतले की, लोकला या मानवी मनाला आनंद देणारी ऋषीतुल्य व्यवस्था आहे. मनावी उत्क्रांतीमध्ये मानवी मनातल हलकल्लोळ, प्रश्न आणि त्याचे दु:ख याचे निराकारण करण्यासाठी प्रथम ऋषी कुळाची व्यवस्था झाल्याचे दिसून येते पण त्यातूनही मानवी मनला शांतता मिळेन आणि दु:ख निवारण होई ना, तेव्हा पुन्हा कुलदैवत व उपास्य देवतांची रचना करण्यात आली, मात्र त्यानंतर ही मानवी मनला शांतता मिळत नाही हे लक्षात आले व उपास्य दैवते व कुलदेव, कुलस्वमीनीची आराधना करण्यासाठी समाजाने जी व्यवस्था उभी केली ती म्हणजे लोककला होय, असे जाणकरांच्या संशोधनातून पुढे येते आहे. ज्ञान, मनोरंन आणि प्रबोधन तसेच दैवतांची आराधना, उपासना या साठी समाजाने निर्माण केलेली लोकला ही व्यवस्था ऋषीतुल्य आहे, अशा शब्दात मंत्री शेलार यांनी लोकलेचा गौरव केला. तसेच नितीन सोनावणे यांनी अत्यंत परिश्रमपुर्वक अशा अस्सल लोकलावंताना शोधून त्यांचे जीवन कॅमेऱ्यात कैद केले आहे हे काम मोठे आहे त्यामुळेच शासनाने त्यांचे पुस्तक प्रकाशित करुन हा ठेवा जतन करण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले
या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना कादंबरिकार विश्वास पाटील यांनी ग्रामण महाराष्ट्रात खेडोपाडयात जतन करणाऱ्या लोककलांचा गौरव केलाच सोबत आज शहरी भागात दहिहंडी मध्ये जो धागडधिंगा सुरू आहे ती म्हणजे लोककला आणि लावणी या कला प्रकाराला पैशांसाठी आलेली सूज आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली व अशा काळात नितीन सोनावणे यांच्या सारख्या छायाचित्रकारांने हे जे काम केले आहे ते मौलिक आहे, असेही नमूद केले
कार्यक्रमाला ज्येष्ठ कलावंत अशोक हांडे, डॉ. तात्याराव लहाणे, राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी डांगे, गझल नवाझ भिमराव पांचाळे, नंदेश उमप, खंडूराज गायकवाड यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते
