खेड : –  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा फटका आता महामार्गालगतच्या आवाशी परिसरातील रहिवाशांच्या घरांना बसत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गावरील पुलाच्या भागात मोठे खड्डे व असमतोल निर्माण झाल्याने अवजड वाहने पुलावरून जाताना जोरदार आदळतात. या धडका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले असून घरातील भांडी व इतर वस्तू पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महामार्गावरील पुलाचा भाग खचल्याने विशेषतः लोडेड कंटेनर व अवजड वाहने खड्ड्यात आदळून पुन्हा रस्त्यावर येताना मोठे हादरे निर्माण होत आहेत. या कंपनांचा थेट परिणाम महामार्गालगतच्या घरांवर होत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. काही घरांमध्ये भिंतींना तडे गेले असून फ्रेम तसेच घरातील वस्तू पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एका रहिवाशाने सांगितले की, पुलावरून अवजड वाहने जाताना होणाऱ्या धडका इतक्या तीव्र असतात की घरातील भांडी आपटतात, वस्तू पडतात आणि भिंतींना तडे गेले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांच्या धडका आणि कंपनांच्या आवाजामुळे झोपही लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पत्रकारांनी यापूर्वीही या समस्येकडे लक्ष वेधून बातम्या प्रसिद्ध केल्या असतानाही संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत, पुलावरील खड्डे आणि असमतोल तातडीने दुरुस्त करून अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे हादरे थांबवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच घरांचे झालेले नुकसान थांबविण्यासाठी तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने महामार्गावरील अनेक धोकादायक ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून निश्चित केली असताना, पुलावरील या धोकादायक स्थितीकडे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार तसेच स्थानिक ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महामार्गाचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी की त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी? असा संतप्त सवाल आता आवाशीतील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.