रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा कार्यकारिणीची बैठक शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार श्री. विनायकजी राऊत यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेच्या अनुषंगाने जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीची काळजीपूर्वक तपासणी करण्याच्या तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे क्रॉस-चेक करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व तालुकाप्रमुखांना देण्यात आल्या. मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव सुरक्षित राहावे, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरापर्यंत संघटना सक्षम करणे आणि पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत राहणे, याबाबत जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस जिल्हा संघटक संजय पुनसकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवराज हांदे, नंददीप बोरुरकर, बळीराम गुजर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद सावंत, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, महिला संपर्क संघटक सुवर्णा खेडेकर, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला संघटक मेघा कदम, उपजिल्हा सहकार प्रमुख प्रवीण साळवी, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख तन्वीर मुजावर, नगरसेविका फौजीया मुजावर, विभागप्रमुख अवंतिका सावंत, लेखिका व शिवसैनिक मेघा कोल्हटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठक खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.