खेड : रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, मध्ये श्रीगणेशाची स्थापना व पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक विकासासोबतच त्यांच्यामध्ये संस्कार व अध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलकडून विविध उपक्रम राबविले जातात. याच उद्देशाने शाळेत गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या तालावर वाजत-गाजत गणरायाचे आगमन केले. त्यानंतर विधिवत पूजन व आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र व मनाचे श्लोक यांचे पठण केले. तसेच संगीत विभाग व विद्यार्थ्यांनी ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’, ‘सनईचा सूर’, ‘ओमकार स्वरूपा’ आदी भक्तिगीते सादर करून गणरायाला वंदन केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमास रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, रो. अभय तलाठी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख सौ. देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख सौ. तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेशोत्सवाचा आनंद लुटला. पूजनानंतर सर्व विद्यार्थ्यांना गणरायाचा गोड प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये गणरायाचे भक्तिमय आगमन !
