मुंबई : ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून काम करत असताना ‘जनसेवा हीच प्रभू सेवा’ हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 मध्ये विकसित भारताची निर्मिती हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकि‍र्दीला घटनात्मक प्रमुख म्हणून 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सेवा संकल्प अभियान राबवण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आदी नेते उपस्थित होते.
भाजपा आणि सहकारी पक्ष, संपूर्ण एनडीए कुटुंब, अनेक स्वयंसेवी संघटना आणि एकूणच देशातील जनता देशभर चालवणार असलेल्या सेवा संकल्प अभियानाची माहिती देताना श्री. अमित शाह म्हणाले, 17 सप्टेंबर हा श्री. नरेंद्र मोदीजींचा जन्मदिवस आहे. आधी गुजरातमध्ये आणि त्यानंतर देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर आणि अनेक ठिकाणी एक आठवडाभर सेवा सप्ताहाच्या माध्यमातून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात होता. मात्र, यावर्षी दीर्घ संघटनात्मक कार्य कारकीर्दीनंतर 7 ऑक्टोबर रोजी मोदीजींच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या देशात फार कमी नेते असे आहेत, ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 25 वर्षे जनसेवेचा विक्रम केला आहे. सलग निवडून येणे, आपल्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास पुन्हा पुन्हा निवडणुकीच्या कसोटीवर सिद्ध करणे आणि सलग 25 वर्षे राज्याचा आणि राष्ट्रकल्याणाचा हा यज्ञ अहोरात्र सुरू ठेवणे, ही खूप मोठी उपलब्धी असल्याने हे सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. संपूर्ण राष्ट्रभर चालणारे हे अभियान प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रात तसेच बूथपर्यंत नेत आम्ही देशातील जनतेपर्यंत पोहोचणार आहोत.
पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांनी देशातील जनतेसमोर ‘प्रधानसेवक’ म्हणून परिचय देत संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग प्रत्येक गरीबाचे जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी, देशाला सुरक्षित करण्यासाठी आणि देशाची अंतर्गत सुरक्षा सुरळीत करून अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले अनेक असाध्य प्रश्न सोडवण्याचे काम करत 15 ऑगस्ट 2047 रोजी भारत संपूर्ण जगात प्रत्येक क्षेत्रात सर्वप्रथम असावा, अशा विकसित भारताची निर्मिती करण्याचा दृढ संकल्प 140 कोटी जनतेला दिला असल्याचे श्री. शाह म्हणाले.
या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून 25 वर्षांची ही प्रेरणादायी यात्रा, तिची उद्दिष्टे, तिची सिद्धी आणि येणाऱ्या दिवसांसाठीचा आमचा संकल्प देशातील जनतेला सांगण्याचे काम आम्ही करणार आहोत. सेवेला संस्कारात परिवर्तित करायचे आहे. संघटनेला जनसहभाग आणि जनकल्याणाचे माध्यम बनवायचे आहे. या दोन उद्दिष्टांना ध्यानात ठेवून सेवा संकल्प अभियानाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये अभियानात शेकडो कार्यक्रम बूथ, मंडल आणि जिल्हा स्तरावर होतील. मात्र, 12 कार्यक्रम संपूर्ण भारतात बूथपासून अखिल भारतीय स्तरापर्यंत होणार असल्याची माहिती श्री. शाह यांनी दिली.
‘सेवा दिवस’ या कार्यक्रमात रक्तदान, दीपप्रज्वलन आणि जनआभार यांचा समावेश असेल. गेली 25 वर्षे जनतेने मोदीजींवर जो विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार मानण्याचा हा कार्यक्रम असेल. ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर देशव्यापी चित्रकला आणि भाषण स्पर्धा आयोजित केली जाईल. यामध्ये मुले, किशोरवयीन आणि तरुण सहभागी होतील. अंगण मिलन सेवा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अंगणवाडी सेविका आणि आशा दीदी यांचा सन्मान हा आहे. या कार्यक्रमात बालके आणि मातांशी संबंधित मोदी सरकारच्या पोषण, आरोग्य आणि महिला योजनांची माहिती दिली जाईल. सेवा कथा या कार्यक्रमाद्वारे मोदी सरकारच्या योजनांमुळे ज्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन झाले आहे त्यांच्या सत्य कहाण्या देशासमोर आणल्या जातील, असे श्री. शाह यांनी नमूद केले.

सेवा ज्योती कलश यात्रा काढत विकसित भारताचा संकल्प केला जाईल. विविध गावे आणि भागांना जोडणे, 25 वर्षांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि ‘विकसित भारत 2047’ घडवण्यासाठी लोकांना एकत्र आणणे, हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. वडनगर – वाराणसी सेवा यात्रा या कार्यक्रमांतर्गत, वडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वडनगर अशी प्रत्येकी 10 गटांमार्फत यात्रा आयोजित केली जाईल. विविध पवित्र नद्यांच्या पाण्याने हटकेश्वर महादेव (वडनगर) आणि काशी विश्वनाथ (वाराणसी) यांचा जलाभिषेक करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. सेवेतील माझे योगदान या कार्यक्रमद्वारे विविध ठिकाणी 25 वेगवेगळ्या सेवा विषयांशी संबंधित उपक्रम राबवणे हा मुख्य उद्देश आहे. सेवा सेतू अभियानाअंतर्गत, प्रत्येक ब्लॉक स्तरावर शिबिरे आयोजित केली जातील.
सेवेचे रंग, राष्ट्रासंगे या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी लोककल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतीके आणि विकसित भारताचा संदेश प्रदर्शित करणे हे उद्दिष्ट आहे. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज कार्यक्रमाद्वारे देशातील युवक, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट नवोन्मेषकांना जोडण्यासाठी पाच प्रमुख प्रादेशिक नवोन्मेष स्पर्धा आयोजित करणे, हा मुख्य उद्देश आहे. सुशासन संवाद हा कार्यक्रम 17 ऑक्टोबर रोजी देशभरात चार ठिकाणी आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांमध्ये देशभरातील हजारो लोकप्रतिनिधी सहभागी होतील. या अभियानाच्या माध्यमातून आपण केवळ पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सेवेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये दिलेला ‘विकसित भारत 2047’ चा संकल्पही अधिक दृढ करू, असा विश्वास श्री. शाह यांनी व्यक्त केला.
यावेळी मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना श्री. शाह म्हणाले, या कालावधीत देशात आणि गुजरातमध्ये अनेक क्रांतिकारी बदल झाले. पायाभूत सुविधा, दारिद्र्यनिर्मूलन झालेच मात्र, लोकशाही व्यवस्थेमध्येही आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. 2014 पूर्वी आपल्या देशाच्या राजकारणाची दिशा भ्रष्टाचार, जातिवाद आणि परिवारवाद या तीन नासूरांनी ग्रस्त होती. 2014 ते 2026 या राजकीय कालखंडात भ्रष्टाचार, जातिवाद आणि परिवारवाद संपुष्टात येऊन देशातील जनता ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च्या दिशेने पुढे गेली आहे. या 12 वर्षांत प्रथमच देशातील जनतेला कणखर परराष्ट्र धोरणाची ओळख झाली आहे. संरक्षण धोरण असो किंवा परराष्ट्र धोरण, त्याचा आधार ‘भारत प्रथम’ आहे. भारताचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे.
ज्या अर्थव्यवस्थेची गणना ‘फ्रॅजाइल फाइव्ह’मध्ये केली जात होती ती आता टॉप फाइव्हमध्ये आली आहे. नुकतेच पहिल्या तिमाहीचे आकडे आले आहेत. 7.8 टक्के जीडीपी वाढीसह मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण सर्वाधिक वेगाने पुढे आहोत. सर्वात मोठी बाब म्हणजे भारतीय भाषांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच महत्त्व मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रथमच भारतीय जवानांवर किंवा जनतेवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये षड्यंत्रातून हल्ला झाला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मजबूत नीती संपूर्ण जगाला आपण दाखवली असल्याचे श्री. शाह यांनी स्पष्ट केले.