भिवंडी : शहरातील खंडुपाडा परिसरातील साफिया स्कूलजवळ असलेल्या उमर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 14 दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तसेच, शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
या आगीत अनेक दुचाकी जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.