भिवंडी : शहरातील कासार सोनार अळी येथील शातलवाल कुटुंबीयांच्या घरी पाच दिवसांच्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. यावेळी घरामध्ये एक फुटाची गणरायाची सुबक मूर्ती स्थापन करण्यात आली असून, गणेशोत्सवानिमित्त जुन्या काळातील घराचा आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आला आहे. शातलवाल परिवाराने साकारलेल्या या देखाव्यात जुन्या काळातील घराची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यामध्ये पितळेची भांडी, चूल आणि चुलीवरचे जेवण अशा जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच गणपती बाप्पांसाठी ताटामध्ये चार मोदक ठेवण्यात आले असून, त्यातील एक मोदक उंदीर मामांनी फस्त केला आहे. मात्र मोदक कमी झाल्याचे लक्षात येताच गणपती बाप्पा तो मोदक शोधत असल्याचा मजेशीर देखावा साकारण्यात आला आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेला हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.