संगमेश्वर : एकता मित्र मंडळाच्या सभागृहाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन; विकासकामांसोबत पर्यटन व पाणीप्रश्नांवरही भर
मौजे ते-ये येथील मधळीवाडीच्या एकता मित्र मंडळाच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार मा. श्री. शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात आणि सामाजिक उपक्रमात ग्रामस्थांना एकत्र आणणाऱ्या या सभागृहाच्या माध्यमातून मधळीवाडीच्या सामाजिक वाटचालीला नवे बळ मिळणार आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम म्हणाले, “गावात एखादी वास्तू उभी राहते, तेव्हा केवळ भिंती उभ्या राहत नाहीत; त्या वास्तूमध्ये गावकऱ्यांचे विचार, आठवणी आणि आपलेपणा जपला जातो. मधळीवाडीतील हे सभागृहही अशाच आपुलकीचे केंद्र बनेल. ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या मागणीला प्रत्यक्ष रूप देताना मला समाधान वाटत आहे. या सभागृहाचा उपयोग गावातील प्रत्येक घटकासाठी व्हावा आणि येथून समाजहिताचे अनेक उपक्रम घडावेत, हीच अपेक्षा आहे.”
मधळीवाडी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना केवळ एखादे काम पूर्ण करणे हा उद्देश नसून, गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासाचा सुधारित आराखडा तयार करून त्यानुसार कामे पुढे नेण्यावर भर दिला जाईल, असेही आमदार निकम यांनी स्पष्ट केले.
परिसरातील पाणीप्रश्न आणि जलजीवनाशी संबंधित कामांनाही प्राधान्य देण्यात येत असून, नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. गावाच्या विकासासोबतच परिसरातील जलसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्याचा उपयोग बोटिंगसह पर्यटनविकासासाठी करता येईल का, याचाही विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळाल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन गावाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
गावातील कार्यक्रमांसाठी जागेची अडचण दूर होऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना आता आपलेपणाची जागा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी या कामाचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, पंचायत समिती सदस्य आरुषी घवाळी, बंड्या पवार, अनंत घवाळी, संभाजी भुरवणे, संजय भुरवणे, प्रभाकर भुरवणे, दिलीप भुरवणे, आत्माराम गोमाणे, रणजीत गोमाणे, सुभाष भुरवणे, आज्ञेश भुरवणे, चंद्रकांत भाऊ माने, काशीराम बारगुडे, शांताराम बडवे, सुषमा भुरवणे, सविता गोमाणे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकतेतून उभे राहणारे हे सभागृह उद्याच्या पिढीच्या आठवणींचे आणि गावाच्या एकजुटीचे साक्षीदार ठरणार असून, विकासकामे, पाणी, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी यांचा समन्वय साधत मधळीवाडीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
