खेड : तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील विद्युत महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांना अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तातडीने कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
महावितरणकडून दर्जेदार सेवेच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात मात्र जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी खेड येथील कार्यकारी अभियंता बाबरेकर आणि लोटे विभागाचे उपअभियंता सचिन विलणकर यांनी स्वतः लक्ष घालून येथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महावितरणने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक पवित्रा संगलट येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.