खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या चार गाड्यांसह गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एकूण ३९० गणपती विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.
नियमित गाड्यांव्यतिरिक्त या विशेष सेवांमध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने ८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन एक्सप्रेस सेवाही सुरू केली आहे. त्यानंतर प्रवाशांची अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन आता मुंबई-सावंतवाडी मार्गावर आणखी चार विशेष सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष गाडी क्रमांक ०१००९ ही २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१०१० ही २० आणि २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडीमध्ये २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना आहे.
गाडी क्रमांक ०१००९ चे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार असून प्रवाशांना रेलवन ॲपचाही वापर करता येणार आहे.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या वेळांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीवर आणि एनटीईएस ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.