मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी भाषा विभाग व मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा दिन’ निमित्त ‘’अभिजात मराठी भाशेचा विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. वैभवी जोशी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात डॉ. संदीप निर्वाण यांनी ‘अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यामागील उद्देष स्पश्ट केला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. संजयकुमार इंगोले यांनी सांगितले की, कोणत्याही भाषेचे भवितव्य त्या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर, संशोधन, ग्रंथनिर्मिती, व ती भाषा बोलणा-या लोकांचा स्वभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांवर अवलंबून असतो. खरे तर मराठी केवळ भाषा नाही तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. त्याकरिता अभिजात मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आपण सर्वांनी पुढील पिढयांकडे पोहचविणे आवश्यक आहे. अभिजात मराठी भाषा दिन एक दिवस साजरा करावयाचा नाही तर आपल्या मातृभाषेबद्दलचा कृतज्ञतेचा आणि जबाबदारीचा दिवस आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यारिता प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजयकुमार इंगोले, प्रा. वैभवी जोशी व श्री. रंजित म्हाप्रळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभवी जोशी यांनी केले तर आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.