चिपळूण : जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य विभाग व आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत सावर्डे वहाळ फाटा येथील समाज कल्याण वस्तीगृह आणि फार्मसी कॉलेज सावर्डे येथील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
हे शिबिर जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जन आरोग्य समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनीपर्यंत आरोग्याच्या योजना व योग्य सुविधा पोहोचवणे हा या विद्यार्थिनींनी किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील गंभीर आजार टाळता येतील, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
तसेच निकम यांनी “आपल्या सर्वांचे आरोग्य उत्तम राहणे हीच समृद्ध गावाची ओळख आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जर आरोग्य चांगले असेल तर शिक्षण पण चांगले होईल आणि अभ्यास करायलाही अधिक ऊर्जा मिळेल. आरोग्याची उत्तम काळजी, परिसराची स्वच्छता आणि सकस व पौष्टिक आहार (Nutrition Food) ही काळाची गरज आहे.” असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती सालवाड यांनी कॅन्सर (कर्करोग) संबंधित प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी विद्यार्थिनींना अत्यंत मोलाचे व सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थिनींची प्राथमिक पातळीवर आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ब्लड प्रेशर (रक्तदाब) आणि शुगर (मधुमेह) यांसारख्या विविध चाचण्या करण्यात आल्या. तसेच विद्यार्थिनींची आवश्यकतेनुसार तपासणी करून त्यांना मोफत औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी समाज कल्याण व फार्मसी कॉलेज वस्तीगृहातील विद्यार्थिनी व गृहपाल उपस्थित होते. तसेच या शिबिरासाठी आरोग्य सहाय्यक श्री. प्रमोद मा. सावंत, समुदाय आरोग्य अधिकारी सौ. स्वाती सालवाड, आरोग्य सेवक श्री. निलेश क. छेत्रे, मेडिकल ऑफिसर डॉ. प्रज्ञा विलासराव नरवडे, मेडिकल ऑफिसर डॉ. दर्शन खोत, आशा सेविका सौ. निशा नि. दिंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी शाळिंभ, मेडिकल ऑफिसर लायबा अन्सारी आणि मेडिकल ऑफिसर साक्षी साळुंखे,श्री. मंगेश पवार आदी उपस्थित होते.