दापोलीः- विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगांव येथील तांत्रिक विभागाने राबविलेल्या कौशल्य स्किल बॉक्स या अभिनव उपक्रमाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमासंदर्भात शासकीय परिपत्रक निर्गमित झाल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्याचा गौरव झाला आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांची ओळख करून देणे, त्यांच्यात प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार रत्नागिरी येथील गोदुताई जांभेकर विद्यालयात लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन विभागाच्या पथकाने कौशल्य स्किल बॉक्स उपक्रमाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात रत्नागिरी परिसरातील 15 शाळांचे सहशिक्षक सहभागी झाले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, तंत्रशिक्षण विभागाचे प्रमुख शेलेश खुळे, तांत्रिक विभागातील शिक्षक आणि संपूर्ण पथकाने मेहनत घेतली. या संकल्पेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. कैवल्य दांडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच उपक्रमाची दखल घेऊन त्याला व्यापक स्तरावर प्रोत्साहन देण्यात शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगांवच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. कैवल्य दांडेकर, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, तंत्रशिक्षण विभागप्रमुख शैलेश खुळे, तांत्रिक विभागातील शिक्षक आणि संपूर्ण पथकाचे अभिनंदन होत आहे.