चिपळूण – दररोज सकाळी आठ वाजता सुटणाऱ्या चिपळूण मुंबई या शिवशाही बसचे शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. या आरामदायी लक्झरी बससाठी अनेकजण आरक्षण करून ठेवतात. परंतु चालक नसल्यामुळे गाडी अर्धा ते एक तासावर लेट करून सोडली जाते. सोमवारी सुद्धा जवळपास एक तास विलंबाने ही गाडी सुटली परंतु चालकच नसल्यामुळे डेपो मॅनेजरना चालकांना अक्षरशः विनवणी करून पर्यायी व्यवस्था करावी लागली.
चिपळूण मुंबई शिवशाही या वातानुकूलित आरामदायी लक्झरी बसला प्रवाशांची विशेष पसंती असली तरी ही गाडी खूप विलंबाने धावत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. सोमवारी तब्बल एक तास ही गाडी विलंबाने मार्गस्थ झाली. मात्र यासाठी आगार व्यवस्थापकाना संबंधित युनियनशी बोलावे लागले आणि दुसऱ्या चालकाला पाठवावे लागले असे एका प्रवाशाने सांगितले.
या संदर्भात आगार प्रमुख श्री राजेशिर्के यांनी खुलासा करताना सांगितले की, चिपळूण आगारातील 23 गाड्या पंढरपूर यात्रेसाठी पाठवण्यात आल्या आहेत. शिवाय चिपळूण मुंबई शिवशाही बसचा चालक अचानक आजारी पडल्यामुळे ही समस्या उद्भवली. अन्यथा एखाद दुसरा अपवाद वगळता ही गाडी वेळेवर नियमित सुटते असे त्यांनी स्पष्ट केले. घडलेला प्रकार त्यांनी मान्य केला मात्र या गाडीला दररोज विलंब होत नाही असे ते म्हणाले.
