चिपळूण: घरकुल लाभार्थ्यांना आठ दिवसात पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात आली नाही तर प्रत्येक तालुक्यात लाभार्थींना सोबत घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा काँग्रेसचे नेते भरत शेठ लब्धे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
श्री. लब्धे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वरील संदर्भानुसार शासन निर्णयान्वये घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे साडे अठरा हजार घरकुल लाभार्थी असून त्यांना शासन निर्णयानुसार वाळू उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
या संदर्भात आपणांस दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. तथापि, आजतागायत जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना घर बांधकाम सुरू करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून ते ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे वारंवार फेऱ्या मारत आहेत.
दरम्यान, वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास अडीच महिने उलटून गेले आहेत. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी मा. जोशी मॅडम यांची या संदर्भात भेट घेतली असता त्यांनी ८ दिवसांच्या आत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले होते. मात्र त्या भेटीस आता सुमारे ७० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
याशिवाय, गेल्या महिनाभरात खनिकर्म अधिकारी मा. जोशी मॅडम यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क करून या प्रक्रियेमध्ये काही प्रगती झाली आहे का याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही, किंबहुना अनेक वेळा दूरध्वनीही उचललेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी निर्माण होत आहे.
त्यामुळे आपणांस विनंती आहे की, येत्या ८ दिवसांच्या आत रत्नागिरी जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. अन्यथा प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
