महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1927 साली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात 19 व 20 मार्च 2026 रोजी कोकणातील महाड येथे होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त 19 मार्च रोजी महाडजवळील लाडवली येथील बेटकर मठातील सभागृहात मानवी हक्क राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व केरळचे माजी शिक्षणमंत्री कॉ. एम. ए. बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, लेखीका डॉ. प्रज्ञा दया पवार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, लोकशाहीर संभाजी भगत, माकपचे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉ. अजित नवले तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक विचारवंत उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे एक हजार प्रमुख कार्यकर्ते या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
परिषदेचे उद्घाटन 19 रोजी दुपारी 2 वाजता होणार असून या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. यावेळी आर. बी. मोरे यांनी लिहिलेल्या ‘महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह’ या पुस्तकाचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील आवृत्तीचे प्रकाशन कॉ. एम. ए. बेबी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ‘आजचे जात वास्तव आणि भारतीय संविधानासमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे.
दि. 20 मार्च रोजी सकाळी 9 वाजता परिषद स्थळापासून कार्यकर्त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाड चवदार तळे आणि ऐतिहासिक क्रांतीभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्याग्रहींना अभिवादन करणार आहे. याबाबतची माहिती रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियन (संलग्न सीटू) चे सरचिटणीस संदीप पवार, अध्यक्ष सुभाष मोहिते, जाती अंत संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक कॉ. शैलेंद्र कांबळे व कॉ. सुबोध मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त उद्या महाड येथे मानवी हक्क राष्ट्रीय परिषद
