रत्नागिरी: मार्च अखेर जवळ आल्याने महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, याचा मोठा फटका रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील सामान्य ग्राहकांना बसत आहे. विभागातील एकूण १,९५,०२० ग्राहकांकडून सुमारे २८ कोटी रुपयांचे बिल येणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ११ कोटींची वसुली झाली असून तब्बल १७ कोटींची थकबाकी शिल्लक आहे.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र, नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत नियमानुसार मुदत संपण्यापूर्वीच काही ठिकाणी वीज कनेक्शन खडीत केले जात असल्याचे विशेषतः राजापूर व संगमेश्वरच्या ग्रामीण भागातून समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बीज पुरवठा खंडित केल्यानंतर जुना मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याने ग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आतापर्यंत सुमारे १७०० बीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यापैकी ११०० ग्राहकांनी तातडीने थकबाकी भरल्यामुळे त्यांचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असला, तरी ६०० ग्राहक अजूनही अधारात आहेत याशिवाय वीज चोरी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
एकीकडे सामान्य ग्राहकावर कठोर कारवाई होत असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडे सुमारे ८ कोटी रुपयांची थकबाकी असूनही त्यांचा बीज पुरवठा खंडित न केल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसेच ५ हजार रुपयापेक्षा जास्त बिलासाठी ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात बँकांच्या वेळेमुळे अनेकाना वेळेत बिल भरता येत नसल्याने त्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
