खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना बसत आहे. तालुक्यातील जवळपास 80 ते 90 टक्के पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, सुरू असलेल्या मोजक्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
आखाती देशांमधील निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीच गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त असताना आता पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
बुधवारी मध्यरात्री अचानक अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने ते तात्काळ बंद करण्यात आले. यामुळे रात्रीच्या वेळी इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी संतप्त नागरिकांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना जाब विचारत धक्काबुक्की केल्याचेही प्रकार घडले.
दरम्यान, ज्या काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा मर्यादित पुरवठा झाला आहे, त्या ठिकाणी इंधन वितरण सुरू करण्यात आले असले तरी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने या तुटवड्याचा परिणाम वाहतुकीवर आणि पर्यटन व्यवसायावरही होताना दिसत आहे.
प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.