मुंबई : राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, बलार्ड इस्टेट, मुंबई येथे पार पडणार आहे.
या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड धनशक्ती, सत्तेचा गैरवापर आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत उमेदवारांनी जिद्दीने लढत देत विजय संपादन केला. हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून लोकशाही मूल्यांचा, जनतेच्या विश्वासाचा आणि सातत्यपूर्ण लोकसेवेचा विजय आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या मतदारसंघात केलेली विकासकामे, नागरिकांशी ठेवलेला थेट संपर्क आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यामुळेच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावरील जनतेचा विश्वासही या यशामागील महत्त्वाचा घटक आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायतराज व्यवस्थेची पायाभरणी करताना सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामविकास आणि लोकशाही मूल्यांचे जतन यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण विकासाचा मजबूत पाया राज्यात उभा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित नसून लोकशाहीच्या बळकटीकरणाचा आणि जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हानिहाय बैठका ३१ मार्च ते १ व २ एप्रिलला मुंबई महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तर्फे राज्यभरातील संघटनात्मक बांधणी बळकट करण्यासाठी ३१ मार्च ते १ व २ एप्रिल २०२६ रोजी जिल्हानिहाय बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे होणार आहेत. या बैठकीत जिल्हानिहाय आढावा, संघटनात्मक पुनर्रचना, स्थानिक स्वराज्य संस्थांतील नव्या पदाधिकाऱ्यांशी संवाद तसेच आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका घेण्यात येत असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
३१ मार्च विदर्भ
मंगळवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून मराठवाडा विभागातील जिल्ह्यांच्या बैठका पार पडतील. अमरावती शहर व ग्रामीण, वाशिम, अकोला शहर व ग्रामीण, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर शहर व ग्रामीण, चंद्रपूर शहर व ग्रामीण, वर्धा भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक स्थिती व आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा होणार आहे.
वेळापत्रक – सकाळी सत्र : १०.३० ते ११.०० – अमरावती शहर / अमरावती ग्रामीण , ११.०० ते ११.३० – वाशिम , ११.३० ते १२.३० – अकोला शहर / अकोला ग्रामीण , १२.३० ते ०१.०० – बुलढाणा , ०१.०० ते ०१.३० – यवतमाळ
दुपारी सत्र : ०२.०० ते ०२.३० – नागपूर शहर व नागपूर ग्रामीण , ०२.३० ते ०३.०० वा. चंद्रपूर शहर व चंद्रपूर ग्रामीण , ०३.०० ते ०३.३० – वर्धा , ०३.३० ते ०४.००- भंडारा , ०४.०० ते ०४.३० – गोंदिया , ०४.३० ते ०५.३० – गडचिरोली
१ एप्रिलचा मराठवाडा : बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून मराठवाडा विभागातील जिल्ह्यांच्या बैठका पार पडतील. यामध्ये परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक स्थिती व आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा होणार आहे.
वेळापत्रक – सकाळी सत्र : १०.३० ते ११.३० – परभणी शहर व ग्रामीण , ११.३० ते १२.३० – छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण , १२.३० ते ०१.३० – जालना शहर व ग्रामीण , ०१.३० ते ०२.०० – राखीव
दुपारी सत्र : ०२.०० ते ०२.३० – हिंगोली , ०२.३० ते ०३.०० – बीड , ०३.०० ते ०४.०० – लातूर शहर व ग्रामीण , ०४.०० ते ०५.०० – नांदेड शहर व ग्रामीण , ०५.०० ते ०६.०० – धाराशिव
२ एप्रिलचा कोकण-ठाणे विभागाचा आढावा
गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी कोकण व ठाणे विभागातील जिल्ह्यांच्या बैठका होतील. सकाळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पनवेल शहर, तर दुपारनंतर ठाणे शहर-ग्रामीण, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार व पालघर या भागांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकींसाठी जिल्हा प्रभारी, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा निरीक्षक, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षाकडून सर्व मान्यवरांना त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठका आगामी राजकीय दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात असून, स्थानिक स्तरावरील प्रश्नांना प्राधान्य देत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
वेळापत्रक – सकाळी सत्र : १०.३० ते ११.०० – सिंधुदुर्ग , ११.०० ते ११.३० – रत्नागिरी , ११.३० ते १२.०० – रायगड , १२.०० ते १२.३० – पनवेल शहर , १२.३० ते ०१.३० – राखीव
दुपारी सत्र : ०२.०० ते ०३.०० – ठाणे शहर व ग्रामीण , ०३.०० ते ०३.३० – कल्याण-डोंबिवली , ०३.३० ते ०४.०० – उल्हासनगर , ०४.०० ते ०४.३० – मिरा-भाईंदर , ०४.३० ते ०५.०० – नवी मुंबई , ०५.०० ते ०५.३० – भिवंडी , ०५.३० ते ०६.०० – वसई-विरार , ०६.०० ते ०६.३० – पालघर .