मुंबई, दि. ३१ मार्च २०२६

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड करणार आहेत. यासोबतच तालुका, मंडळ स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असून हे वर्ष ‘संघटन वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व ‘संघटन सृजन अभियान’चे समन्वयक यांची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजीत कदम, रणजित कांबळे, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. बळवंत वानखेडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष माजी आ. वजाहत मिर्झा यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू झाले असून महाराष्ट्रात २७ मार्चपासून हे अभियान सुरू झाले आहे. १ मेपर्यंत या संदर्भातील शिफारशींचा अहवाल पूर्ण होईल व त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जातील. राज्यात ७२ जिल्हाध्यक्ष व ७५० तालुकाध्यक्ष असतील. संघटना गावस्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामशाखा सुरू केल्या जाणार आहेत. याबरोबरच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एससी, एसटी, ओबीसी विभागांचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

अशोक खरात प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांची संख्या अधिक असल्याचा संशय आहे. मात्र, गृहविभागाकडून काही निवडक (सिलेक्टिव्ह) व्हिडिओच लीक केले जात असून, त्यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. खरातच्या सीएकडे मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याच्या बातम्या येत असून हा पैसा नेमका कोणाचा, असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

इंधन टंचाईबाबत फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे असल्याची टीका करताना ते म्हणाले की, देशात पेट्रोल पंपांवर व एलपीजी गॅससाठी रांगा लागत आहेत. याचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर फोडणे हास्यास्पद आहे. काँग्रेस व राहुल गांधी अफवा पसरवत नाहीत, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत भाषण करताना कोरोनासारखी परिस्थिती असल्याचे विधान केले होते. त्यातूनच लोकांमध्ये लॉकडाऊनची भीती निर्माण झाली. दुसरीकडे, मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले असून त्यामुळे जनतेला इंधन व एलपीजी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र, भाजपा सरकार आपली जबाबदारी झटकून काँग्रेसवर आरोप करत असल्याचेही सपकाळ म्हणाले.