लोटे (ज्ञानेश्वर रोकडे) : गेले कित्येक दिवस वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात संतप्त ग्रामस्थांचा दणदणीत मोर्चा काढण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या मदतीशिवाय ग्रामस्थांनी हे आंदोलन यशस्वी केले. “हा कारखाना बंद झालाच पाहिजे” अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने आज कोकणी जनतेने या कारखान्यावर मोर्चा काढला.
या कारखान्यात घेण्यात येणारे अत्यंत घातक ‘पी-फॉस’ रसायन कोकणाच्या निसर्गासाठी तसेच मानवी जीवनासाठी घातक आहे. त्यामुळे हे उत्पादन या कारखान्यात घेतले जात असेल, तर हा कारखाना बंद झालाच पाहिजे, अशी मागणी करत हजारो आंदोलकांनी मोर्चा काढला. यामध्ये कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, अखिल दाभोळ खाडी मच्छीमार संघटना तसेच असंख्य सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संघटना आणि पंचक्रोशीतील गावांमधून आलेले कोकणी बांधव व भगिनी उपस्थित होते.
“पी-फॉस हटाव, कोकण बचाव”, “बंद करा, बंद करा लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा”, “नफा तुमच्या खिशात आणि आजार आमच्या दारात” इत्यादी घोषणा मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.
हा कारखाना बंद व्हावा या मागणीसाठी गेले ७६ दिवस कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू आहे. श्री. अशोक जाधव आणि श्री. राजेंद्र गोपीनाथ आंब्रे हे गेल्या ७६ दिवसांपासून हे आंदोलन करत असून, हळूहळू त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण जिल्हाभरातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाच्या वेळी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावर मोर्चा थांबवण्याच्या सूचना आंदोलनकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. तिथपर्यंत आल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने श्री. उदय घात यांनी आंदोलनामागील पार्श्वभूमी आणि उद्देश प्रशासनाला सांगितला. धरणे आंदोलनात बसलेले अशोक जाधव यांनी सांगितले की, हे आंदोलन कोण्या एकट्याचे नसून सर्व कोकणी जनता, शेतकरी आणि निसर्गासाठी आहे.
हा कारखाना बंद होण्यासाठी गेल्या ७६ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. तरीही प्रशासनाने किंवा कारखाना व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तसेच महाराष्ट्र शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हे गांभीर्याने घेतलेले नाही. म्हणून आम्हाला हा मोर्चा काढून कोकणी जनतेची ताकद दाखवावी लागली. अजूनही सरकार आणि प्रशासन यांनी दखल घेतली नाही, तर आमचे आंदोलन यापुढेही असेच, किंबहुना याहून अधिक तीव्र करण्यात येईल, असे सांगितले.
